लग्न पहावे दुरून
आपल्याकडे असा माणूस क्वचितच सापडेल जो कोणत्याही लग्नाला गेला नाही.तर लग्न आणि त्यातले भन्नाट अनुभव सर्वानाच येतात.
लग्न म्हणले कि पाहुणे आलेच.प्रत्येक पाहुणा हा एक वेगळेच 'रसायन' असतो.लांबचे पाहुणे,जवळचे पाहुणे आणि खूप जवळचे असे काहीसे वर्गीकरण होते.पण सरबराई तेवढीच करावी लागते.नाहीतर 'रुसवे फुगवे' हे त्यांच्या बरोबर आलेले आणि नको असलेले पाहुणे.☺
काही पाहुण्यांची ओळख तिथेच पुन्हा 'नव्याने'होते.पण तरीपण ओळखलेस का रे/ग हा प्रश्न असतोच.(न टाळता येणारा).त्यावर जो बरोबर उत्तर देईल तो वाचला नाहीतर आजची पिढी यावर पुढचे संवाद.एखादे मोठे काका/वृद्ध आजोबा (जास्त जवळचे नाही) हे खूप दिवस आधीपासून राहायला (जागा पकडायला☺) येतात.थोडेसे अबोल.ते कोपऱ्यात बसून(जागा पकडून) सर्व(मिळतील तेवढे)पेपर चा फडशा पाडतात आणि अधेमधे "मला पण जरा काम सांगा" असे पेपर थोडासाच बाजूला करून अधिकाराने सांगतात.मध्ये मध्ये राजकारण/क्रिकेट यावर ज्ञानाची देवाणघेवाण होते.एखादी खाष्ट काकू/आत्या असतेच.तिला खूप लग्नामध्ये काम केल्याचा 'experience' असतो.त्यामुळं जर जबादारी त्यांच्यावर असेल तर जेवढा काही चेहरा 'गंभीर ' करता येईल तेवढा करून त्या संपूर्ण लग्न वावरतात.त्यांचा भटजी ते भाजी असा दांडगा अनुभव असतो आणि अधेमधे आधीच्या झालेल्या लग्नातल्या चुका(त्या नव्हत्या म्हणून) यावर बोलत राहतात.लग्नाच्या वेळेस एक तरी पाहुणा हा 'ताप/जुलाब/सर्दी/डोकेदुखी' या सर्वसामान्य अशा रोगांनी आजारी असतोच.आणि मग तो अधेमधे 'climate change'(actual प्रवास मुंबई/पुणे-एखादे गाव) असे काहीसे शब्द 'फेकत' असतो.पण भाव असा कि 'foreign' मधून आताच उतरले आहेत.असो.
लग्नात मुलाचे मित्र मदतीला म्हणून येतात.पण अधेमधे 'आता आमच्याशी कशाला बोलशील'असे काहीतरी मुलाच्या आईला ऐकू येईल या आवाजात म्हणणार.आणि लग्नाच्या वेळेस उगीचच 'ब्लेझर'नीट करत म्हणतात 'आता 'व्यवस्थित' दिसत आहेस'☺.(म्हणजे हे नसते तर).मुलीच्या मैत्रिणी पण असेच काहीसे प्रकरण असते.त्या येऊन मुलीच्या 'makeup'ची जबाबदारी उचलतात.लग्नाच्या वेळेस मुलीची 'नथ/टिकली/कानातले'उगीचच हलवून 'आत्ता मस्त दिसते आहेस' असे सांगणार.आणि नंतर पूर्ण लग्न मी हिच्या किती जवळची अश्या थाटात मिरवणार. वरात हा एक महत्वाचा प्रकार.त्यात 'वाजंत्री'वाले नेहमी 'न नाचता' येण्यासारखेच गाणी का वाजवतात हे न उलगडणारे कोडे आहे.लेटेस्ट गाणी वाजवा म्हणले तर '2000' साल मधले गाणी वाजवणार.त्यात पण वराती 'जागा आणि गाणी' याना adjust करून जसे नाचत येईल तसे नाचतात.कधी फुगडी,लाडू डान्स,गणपती डान्स,फ्री(अंगविक्षेप) असे प्रकार बघायला मिळतात.मित्रांना तर तीच नामी संधी असते.(लग्नात आलेल्या 'स्थळांकडे' बघत नाचायचा 'अभिनव' प्रयोग ते करत असतात).
भटजी.त्यांना 'काकू/मामी/आत्या यांच्या 'reference' वर बोलावलेले असते.काही भटजी हे 'मनमोकळे/हसरे असे असतात.ते अधेमध्ये वातावरण 'हलके' करत असतात.काही गंभीर(प्रोफेशनल म्हणता येईल😊)असतात.ते फक्त 'लग्न लावायला' आलेले असतात.कोणाचे लग्न/कोण काय बोलते आहे याकडे त्यांचे लक्ष नसते.आणि काही 'उरके'पण पाहायला मिळतील(ज्यांनी एकाच दिवसाचे 2 लग्नाचे 'कॉन्ट्रॅक्ट' घेतलेले असते).त्यांनी मधले 'विधी'गुंडाळलेले असतात(हे फक्त 'चाणाक्ष काकूंना'कळते).तर अश्या सगळ्यात लग्नाची तयारी पूर्ण होते(ती सहसा झालेली नसते तो फक्त 'भास' असतो).ऐनवेळेला भटजी काहीतरी छोटी गोष्ट मागणार आणि ती त्या हॉलमध्ये उपलब्ध नसणार(हे होतेच).मग पुन्हा थोडावेळ 'विधी'ब्रेक.
मंगलाष्टका हा अजून एक अविभाज्य भाग.एखाद्या 'हौशी' काकू/मावशी/आत्या यांना ती म्हणायची असतेच.मग माईक हातात त्या आपली हौस भागवतात.त्यांच्या आवाजाची हलक्या आवाजात 'स्टेजच्या खाली' चेष्टा होते.मग अंतरपाट काढून हार घालायची वेळ येते त्यावेळी 'उत्साही' कार्यकर्ते 'मुलाला/मुलीला' उचलतात.हा खेळ थोडा वेळ झाल्यानंतर दोघेही 'हार' पत्करतात😊.मग एकदाचे लग्न लागते आणि अक्षता पडतात.त्यातल्या 75% अक्षता 'पोहोचत' असतील.बाकीच्या 'करमणुकीचे साधन ' या सदराखाली असल्यासारख्या वापरल्या जातात.काहीजण 'मित्राला/मैत्रिणीला/बायकोला/ लहान मुलांवर टाकण्यासाठी वापर करतात.इथे पद्धत बदलायची खूप गरज आहे असे वाटते मग. काही महाभाग तर त्या 'तोंडात ' पण टाकतात. मग झुंबड उडते ती जेवणाकडे जाणाऱ्यांची आणि 'आहेर' देणाऱ्यांची(का ते अजून कळले नाही.'आहेर' देणारे हे घाईत येतात आणि जातातही.त्यात जमेल तशी ओळख होते.'ओळखलेस का?','लहानपणीची शेजारची आत्या/मावशी','वेगळाच दिसतो/ते आता' असे काहीसे संवाद.'या एकदा सवड काढून घरी' (?)हे वाक्य जवळपास सर्वांकडून ऐकायला मिळते.यावेळी चेहरा हसरा ठेवावाच लागतो.कितीही ओळख सांगितली तरी स्टेजवरून खाली उतरल्या उतरल्या आपण विसरून जातो☺. ऑफिस गॅंग किंवा मित्राची टोळी(पिळायची नामी संधी)भेटायला येते.ओळख झाल्यावर 'का रे tension आले का' असे काहीसे पांचट प्रश्न विचारून उगीचच हसणार(त्याचवेळी स्टेजवरून ते लग्नात आलेल्या स्थळांनाही 'हेरत' असतात😊)आणि लवकर खाली न उतरता गप्पा मारून पिळत बसतात.
फोटोग्राफर हा भटजी नंतरचा महत्वाचा प्राणी लग्नात असतो.तो सतत कोणाला तरी 'टिपत'असतो(त्याला प्रत्येक वेळेलाच समजवावे लागते कि कोणते फोटो पाहिजे आहेत).ज्यावेळी 'आहेर' द्यायला 'line' लागलेली असते त्याचवेळी फोटोग्राफरला घाई झालेली असते.त्यामुळं 'हालते फोटो' नंतर बघायला मिळतात. नवरा मूलगा आणि मुलगी यांचे 'photosession'(actually फोटोशोषण) हा सर्वात जास्त त्रासदायक भाग.कितीही थकला असला तरी हसायचे(म्हणजेच शोषण😊☺).'उसने हास्य' काय असते हे माणूस तिथेच शिकत असेल कदाचित.'वेगवेगळ्या poses' देऊन चेहऱ्यावर हास्य टिकवण्याचे आव्हान/आदेश/विनंती वजा सूचना तो सतत करत असतो.त्यामुळे नसलेलं टेन्शन पण तोंडावर दिसते.
मग येते वेळ जेवणाची म्हणजेच पंगत.त्यात 'बुफे'आणि 'पंगत' हे दोन वेगवेगळे प्रकार लग्नात बघायला मिळतात.जुन्या लोकांच्या मते बुफे म्हणजे शक्यतो ताटा ची 'कसरत'करत जेवणे.काही अंशी ते पटतेही.पंगत म्हणजे टेबल आणि खुर्ची.लग्नात (बुफे) जेवणात ती मजा नाही जी पंगतीत येते .जसं की -
ताट पाण्याने स्वच्छ करून घेणे,आणि मग परत पाणी मागून घेणे😊
ताटा ऐवजी पत्रावळी असेल तर ती उडु नये म्हणुन त्यावर पाण्याचा ग्लास ठेवणं.
दाळ आणि भाजीवाल्याला तर्री तर्री टाक म्हणून सांगणे,
दोन बोट दाखउन दोन गुलाबजामुन टाकायला सांगणे,
पोळ्या किंवा पुरी गरम गरम बघुन घेणं(काहीजण करतात)
शेजारी कोणी ओळखीचा असेल तर त्याला बळजबरी उरलेली पोळी/पुरी देणं ,
पाण्यावाला लांबूनच येताना दिसला की पाणी पिउन परत ग्लास भरुन घेणं,
पहली पंगत कधी उठणार याचा अंदाज घेउन दुसर्या पंगतीसाठी अडजस्ट करायला बघणं.
वाढपी पण इतके 'घाई'मध्ये फिरत असतात कि 'पदार्थ' कुठला/आपल्याला पाहिजे का हे कळेपर्यंत ते दुसऱ्या'line' मध्ये पोहोचलेले असतात.
त्यात कधी कधी टेबलाचा पाय मोडून 'कशाच्या'तरी आधारावर लावलेला असतो.त्यामुळे त्यावर जेवणाऱ्याला 'संमिश्र'जेवण मिळण्याची शक्यता असते. पंगतीत आपल्याला पाहिजे तो पदार्थ मागच्या किंवा पलीकडच्या ओळींमध्ये फिरत असतो.जो ताटात आहे तोच पदार्थ 'पाहिजे का'असे 'शक्य तेवढ्या वाईट तोंडाने' विचारले जाते.(त्याचे वेगळे प्रशिक्षण वाढप्याना दिले जात असेल कदाचित) आणि जसे जेवण संपायला येईल तेवढ्यात मग एखादे 'हौशी' मामा/काका हे वाढप्याबरोबर 'थोडं हे घे,हे संपवले नाही अजून,अजून वाढू का ?' असे धमकावत फिरत असतात.हे सर्व झाले कि मग शेवटची पंगत.हि सहसा सर्व जेवायचे राहिलेले लोक दमल्यावर असते.(दुपारच्या लग्नात सहसा दोन ते अडीच या वेळेत).त्यात सर्वांचे लक्ष 'वधू आणि वरा' कडे असते.आधी उखाणे मग जेवण हा 'अलिखित' नियम पाळून.मग त्याचवेळी कुठेतरी कोपर्यात कुजबुज.कुठे तरी नाखुशी.
आणि मग पाठवणीची वेळ.लग्न पावन पुण्यात असेल तर 3 वेळा ' बेल' वाजवली जाते आणि कार्यालयाचा माणूस 1/2 वेळा येऊन कानात कुजबुजूनही जातो.मग शेवटचा उपाय म्हणून झाडणारे आणि खुर्च्या उचलणारे पाठवले जातात.त्यांना अनुक्रमे कचरा आणि खुर्च्या या दोनच गोष्टी दिसत असतात.त्यामुळे ते माणसे बघायची तसदीही घेणार नाहीत कि कोणी बसले आहे(त्यासाठी वेगळे पैसे लागत असतील कदाचित).लग्न मुंबईमध्ये असेल तर प्रश्नच नाही.'लोकल,ट्रॅफिक' या भीतीमुळे 80% लोक जेवण झाल्या झाल्या निघून जातात.त्यामुळे राहिलेले पण 5 च्या घडीला घरी असतात(जेवण,आहेर या वर चर्चा करत).इकडे मुलीची आवराआवर.मुलाकडचे मित्र,नातेवाईक हे सामान गाडी/बसमध्ये चढवून ताटकळत बसलेले असतात.काही माणसे(दीड पायावर उभारून) उगीच दर 5 मिनिटांनी घडयाळ बघत असतात(वेळ फार बदलेली नसते आणि मग च्च/च्चक असा काहीसा 'निराशावादी' आवाज काढणार😊).मग मुलगी बाहेर निघते.परत तोच खेळ.लोक गाडी बसमध्ये जाऊन बसतात.आणि इथे मुलगी 'जड'पावलाने निघत असते.परत च च आवाज कोपऱ्यातून येतो.मग ती सगळ्याना भेटून पुढे सरकत असते.कोणी आत्या,काकू,मामी तिला 'आता नाही रडायचे/किती छान नवरा/ सासर मिळाले आहे'अश्या 'गळ्यान'सांगत असतात.आणि मुलगी एकदाची गाडीत बसते आणि बाकीचे (खोळंबलेले) लोक सुस्कारा सोडतात.पण तो सेकंदासाठीच😊.कारण परत फिरून फिरून हीच वाक्ये तिच्या गाडीच्या दरवाज्यासमोर ऐकू येतात.थोड्या प्रतीक्षेनंतर कुणीतरी म्हणते'अरे पुन्हा त्यांना उशीर होईल,जाऊद्या गाडी'.या आज्ञेचे पालन होऊन गाडी निघते(आणि मुलगी सुखी संसाराची स्वप्ने बघत खिडकीतून बाहेर बघत राहते).
तर अशी हि लग्न कहाणी.थोड्या फार फरकाने सर्वत्र असते.त्यामुळे पुढे कुठल्या लग्नात गेला तर हाच 'अनुभव' मजेत घ्या(च्च/च्चक न करता😊).
नमस्कार.